मुखपृष्ठ >> लोकमानस
 


स्पर्धेचे नियम व अटी




लोकमानस
Print E-mail
बुधवार, ८ सप्टेंबर २०१०
लोकायुक्तांना निर्णायक अधिकार हवेत
काही दिवस कर्नाटकातील लोकायुक्तांनी तेथील भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठविले, अशा बातम्या वाचनात येत होत्या. नुकतेच असे वाचनात आले की, लोकायुक्तांच्या निर्णयाविरुद्ध केलेली अपिलेसुद्धा फेटाळली गेली. त्यावरून तेथील लोकायुक्तांना तसे निर्णायक अधिकार असावेत, असे दिसून येते. आता तर कर्नाटक शासन लोकायुक्तांचे अधिकार वाढविणार आहे असेही समजते. आपल्या येथील लोकायुक्तांना असे अधिकार आहेत हेच जाणवत नाही.
महाराष्ट्र लोकायुक्तांना काहीच अधिकार नाहीत असे दिसून येते, कारण लोकायुक्तांनी दिलेल्या ‘अंतिम’ निर्णयाप्रमाणे तीन महिन्यांच्या आत संबंधित खात्याने कारवाई अगर अंमलबजावणी केली नाही तर लोकायुक्त तसा अहवाल राज्यपाल यांना पाठवितात व तेथेच त्यांच्याकडील कारवाई थांबते. राज्यपाल त्यावर काही कारवाई करीत नाहीत. फक्त एकूण लोकायुक्तांनी असे किती अहवाल पाठविले याचा गोषवारा विधिमंडळास सादर करतात.
येथे एक लक्षात घेतले पाहिजे की, लोकायुक्त जेव्हा आपला अंतिम अहवाल देतात त्या वेळी संबंधित खात्याने त्यांच्या पहिल्या अहवालावर उपस्थित केलेल्या सर्व मुद्दय़ांचा तपशीलवार विचार करूनच अंतिम अहवाल देतात. त्यावर संबंधित व्यक्तीस न्याय मिळणे जरूर असते, पण सध्याच्या पद्धतीत तसे होत नाही व राज्यपालांकडून काही कारवाई न होता प्रकरण फाईल होते. सरकारी कार्यालयाविरुद्ध निर्णय गेला की ते कार्यालय लोकायुक्तांच्या अहवालावर कारवाई करणार नाही व प्रकरण फाईल होईल हे ओघानेच आले व त्यामुळे संबंधित व्यक्तीस कधीच न्याय मिळणार नाही.
लोकायुक्तांच्या अहवालावर कारवाई होईल हे पाहायचे नसेल तर लोकायुक्त कार्यालयावर खर्च कशासाठी? त्यांना अंतिम अधिकार असतील तरच त्या कार्यालयाचा उपयोग होईल.
वि. म. मराठे, सांगली

स्फूर्तिदायी व्यक्तिमत्त्व
भारताचा मास्टर-ब्लास्टर, क्रिकेटचा विक्रमादित्य सचिन तेंडुलकर शुक्रवारी (३ सप्टेंबर) एका वेगळ्याच युनिफॉर्ममध्ये पाहायला मिळाला. सचिनचा युनिफॉर्म होता एअरफोर्सच्या ग्रुप कॅप्टनचा. इंडियन एअरफोर्सने ‘ग्रुप कॅप्टन’ हा किताब बहाल करून सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा किताब रोवला गेला. ‘ग्रुप कॅप्टन’च्या युनिफॉर्ममधील सचिनचे देखणे रूप प्रत्येक युवकाला स्फूर्ती देणारे आहे. सचिनने ‘ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर’ म्हणून हवाई दलाच्या परिवारात प्रवेश केला आणि तरुणांना आवाहन केले आहे, की हवाई दलात दाखल होऊन देशसेवा करा. स्वप्ने बघा, त्याचा पाठपुरावा करा, ती प्रत्यक्षात उतरताना दिसतील. सचिन या नावामध्ये जिद्द, चिकाटी, कार्यक्षमता, स्वप्नपूर्तीची ताकद असल्यामुळे तरुणांना एअरफोर्समध्ये दाखल होण्याची प्रेरणा मिळणार आहे.
आत्माराम गायकवाड, लोअर परळ, मुंबई

असोसिएशनमुळेच लाभ मिळतो
बँक असोसिएशन ही बिनकामाची संस्था बरखास्त करण्याबद्दलचे पत्र आणि त्यावरच्या प्रतिक्रिया वाचनात आल्या.निवृत्तीसमयी मिळणारी ग्रॅच्युइटी आणि अन्य लाभ स्टेट बँक पेन्शनर्स असोसिएशनने कोर्टात खटला दाखल करून मिळविली आहे. सेवानिवृत्तांना अन्य आर्थिक लाभ वाटाघाटींद्वारा मिळवून देण्यात असोसिएशनचाच सिंहाचा वाटा आहे. पेन्शर्सना फक्त रु. ७५० पेन्शनवरच समाधान मानावे लागले असते. पेन्शनमधील वाढ ही सुप्रीम कोर्टामध्ये असोसिएशनने खटला करूनच प्राप्त झाली आहे. योग्य वेळी योग्य कामासाठी कोर्ट केसेस दाखल करून मिळविलेले यश हे असोसिएशन बरखास्त करण्यासाठी निश्चितच नाही. सेवानिवृत्तांच्या हितासाठी या संस्थेची वाटचाल चालूच राहायला हवी.
नरहरी हंजनकर, एस. डब्ल्यू. नाडकर्णी, मुंबई

कलियुगात खरे बोलणे पाप आहे
लेखिका गिरिजा कीर यांनी त्यांचे मत जाहीर केले ते सत्य आहे याचा पदोपदी अनुभव येतो. लेखिकेने स्वत:चे मत निर्भीडपणे परखड शब्दांत व्यक्त केले आणि पुरोगामी संघटनांनी नेहमीप्रमाणे विरोध करायचा म्हणून निषेध करून लेखिकेची उमेदवारी रद्द करण्याची मागणी बहुमताने केली. ‘खरे कधी बोलू नये, खरे बोलणे पाप आहे,’ असे धडे गिरविणाऱ्या लोकशाहीत जाहीर भाषण करताना मतांचा समतोल ठेवणे आवश्यक असते. वास्तविक लेखिकेच्या मताशी सहमत असणारी जी जनता आहे त्यात पुरोगामी संघटनांचे नेतेही आहेत.
‘झोपडपट्टीत सुशिक्षितही राहतात त्यांच्यावर माझा जातीय आक्षेप नाही.’ हे मत लेखिकेने आपल्या भाषणात त्याच वेळी व्यक्त केले असते तर साहित्य क्षेत्रातील पुरोगामी राजकारण्यांनी आक्षेप घेतला नसता व प्रकरणाला फाटे न फुटता प्रकरण तेथेच संपले असते. त्यांचे सभासदत्व रद्द करण्यासाठी टोकाची भूमिका त्वरित घेणारे पुरोगामी, साक्षरतेचे प्रमाण वाढविण्यासाठी किती प्रयत्न करतात? प्रमाण किती टक्के आहे? किती पट वाढले? याची नोंद या नेत्यांकडे आहे काय?
झोपडपट्टीत सुशिक्षितही राहतात त्यांच्यावर हा आक्षेप नसून लेखिकेचे हे मत ‘सुशिक्षितांची मक्तेदारी’ वाटत असेल तर त्यावर टीका करण्याऐवजी सर्वाना समान सुशिक्षित करण्यासाठी या पुरोगामी संघटना कोणते प्रयत्न करतात?
साहित्य संमेलन संयोजन समितीचे सदस्य सोमण यांनी लेखिकेच्या मताशी आपण ‘सहमत नसल्याचे’ जाहीर केले. सोमण यांनी ‘मौन’ धारण करायला हवे होते, कारण ‘सत्य’ सांगण्यासाठी लेखिकेच्या जाहीर मतांची गरज नाही. ‘साक्षरता- निरक्षरता आणि साहित्य क्षेत्र यांच्यातील दुरावा प्रचंड आहे.’ हे सत्य व्यक्त केल्याबद्दल लेखिकेची उमेदवारी रद्द केली जाईल, कदाचित लेखिका जाहीरपणे माफी मागून आपले अस्तित्व कायम ठेवतील कारण आपल्या देशात बहुमत खोटे असले तरी बहुमताचाच विजय होतो! सत्याचा स्वीकार केलाच जात नाही! तोपर्यंत ही परिस्थिती सुधारणार नाही!
नलिनी भांडारकर, अंधेरी, मुंबई

रक्कम पडून नव्हे तर सुरक्षित
पुण्यात झालेल्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या खर्चातून शिल्लक उरलेल्या ८२ लाख रुपयांचा धनादेश स्वीकारताना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. वि. भा. देशपांडे यांनी महाकोषाबाबत केलेल्या विधानासंदर्भात खुलासा करणे आवश्यक आहे.
‘महाकोषामध्ये साठ लाख रुपये पडून आहेत,’ असे म्हणताना महाकोष (म्हणजेच संमेलन निधी) हा ‘कॉर्पस’ आहे व म्हणूनच त्यातील मुद्दल कधीच खर्च करता येत नाही, त्यावरील व्याज खर्च करता येते हे माहीत असणे अपेक्षित आहे.
महामंडळाच्या घटनेतील परिशिष्ट ‘ई’मध्ये ‘निधीचा विनियोग’ या शीर्षकाखाली असे स्पष्ट नमूद केले आहे, की ‘संमेलनास आर्थिक साहाय्य करणे हा उद्देश असल्याने विश्वस्त मंडळाने योग्य ती तरतूद निधीवरील फक्त व्याजातूनच करावी’ त्यामुळे महाकोषातील साठ लाख रुपये ‘पडून’ नव्हेत तर सुरक्षित राखून ठेवले आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने साहित्यप्रेमींच्या देणग्यांमधून महामंडळाने स्वबळाने करावीत या उद्दिष्टाने महाकोष उभारल्यामुळे, त्यातील व्याज फक्त साहित्य संमेलनावरच खर्च करता येईल, इतर उपक्रमांवर नाही, हेही स्पष्टच आहे. २००१ पासून महाकोषावरील व्याजातून साहित्य संमेलनातील एका परिसंवादाचा खर्च करण्यात येतो.
प्रारंभी विश्वस्त मंडळाने असे ठरविले होते, की महाकोषामध्ये एक कोटी रुपये जमा होईपर्यंत फक्त प्रतिकात्मक म्हणून एका परिसंवादाचा खर्च संयोजकांना द्यावा, याव्यतिरिक्त इतर कोणताही खर्च न करता महाकोषावरील व्याजाची उर्वरित सर्व रक्कम पुन्हा महाकोषात जमा करावी, ज्यामुळे महाकोषात नियमित भर पडेल. मात्र आता विश्वस्त मंडळाच्या नव्या धोरणानुसार महाकोषातील व्याजातून संमेलनासाठी एका परिसंवादाहून अधिक खर्च करण्यात यावा, असा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत झाला आहे.  
प्रा. उषा तांबे, वसुंधरा पेंडसे- नाईक
महाकोष प्रमुख विश्वस्त  व कार्यकारी विश्वस्त
 
<< Start < Prev 1 2 3 4 5 6 Next > End >>

Page 1 of 6

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

दिनांक ८ सप्टेंबर २०१० बुधवार मिती श्रावण वद्य अमावस्या १६ क. ०० मि. पूर्वा नक्षत्र २३ क. ५० मि. सिंह चंद्र २९ क. ५ मि.पर्यंत. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४७. दर्श अमावस्या पोळा.
मेष -
योजना वेग घेतील, वृषभ - घरगुती प्रश्नांवर लक्ष ठेवा, मिथुन - महत्त्वाची कामे होतील, कर्क - जबाबदाऱ्या पूर्ण कराल, सिंह - नवे तंत्र यशस्वी ठरेल, कन्या - विचाराने पावले उचला, तुला - अनेकांचे सहकार्य मिळेल, वृश्चिक - प्रिय व्यक्तींच्या भेटी, धनु - मोठी उलाढाल होईल, मकर - थांबा बघा पुढे चला, कुंभ - वेळ वाया घालवू नका, मीन - मार्ग सापडतील, यश मिळेल.
शुभराशी- मिथुन, सिंह, तुला.