मुखपृष्ठ >> लेख >> घडामोडी - कोल्हापूर :भुदरगड पतसंस्थेच्या जागा लिलावात घेणाऱ्यांचे डोळे पांढरे!
 


स्पर्धेचे नियम व अटी




घडामोडी - कोल्हापूर :भुदरगड पतसंस्थेच्या जागा लिलावात घेणाऱ्यांचे डोळे पांढरे! Bookmark and Share Print E-mail
राजेंद्र जोशी ,  शुक्रवार, ३० जुलै २०१०
‘ज्याचे करावे भले, तो म्हणतो माझेच खरे’ असे म्हणण्याची वेळ सध्या संगीत प्रसाराची शतकोत्तर परंपरा असलेल्या कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लब या संस्थेवर आली आहे. राज्यातील अवसायनात निघालेल्या भुदरगड नागरी पतसंस्थेच्या हजारो ठेवीदारांचे हित जोपासण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त अवसायक समितीने जाहीर केलेल्या लिलाव प्रक्रियेत या संस्थेच्या विश्वस्तांनी संस्थेसाठी स्वत:च्या मालमत्ता गहाण ठेवून १ कोटी २१ लाख रुपयांना भुदरगडची मालमत्ता खरेदी केली खरी, पण पैसे भरून सहा महिने उलटत चालले तरी प्रक्रियेतील दिरंगाईसंबंधित मालमत्ता संस्थेच्या नावावर होण्यास अडथळा बनली आहे. परिणामी, संस्थेसाठी काढलेल्या कर्जाच्या व्याजाने विश्वस्तांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली असून, ‘मालमत्ता नको, पण व्याज आवरा’ असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे.
राज्यातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून गणली जाणारी भुदरगड नागरी पतसंस्था ८ वर्षांपूर्वी डबघाईला आली. सुमारे ४२ हजार सभासद आणि २ लाख ठेवीदार अशी भक्कम स्थिती असलेल्या या संस्थेत संचालकांनी केलेल्या मनमानीने ठेवीदारांच्या २५० कोटी रुपयांवर गंडांतर आले. या हवालदिल झालेल्या ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी अंतिम उपाय म्हणून मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर खंडपीठाने संस्थेवर विभागीय सहकार  सहनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली एक अवसायक समिती म्हणून तर संस्थेच्या मालमत्तांची लिलावाने विक्री करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची विक्री प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. यानुसार अवसायक समितीच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने २ जानेवारी २०१० रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार १० फेब्रुवारी २०१० रोजी आयोजित लिलावात देवल क्लबने खासबाग मैदान येथील भुदरगडची मालमत्ता सर्वाधिक १ कोटी २० लाख रुपयांची बोली देऊन विकत घेतली. या प्रक्रियेतील अटीनुसार लिलावावेळी संस्थेने लिलाव रकमेच्या १५ टक्के रक्कम तातडीने भरून उर्वरित ७ लाख २५ हजार रुपयांच्या मुद्रांक शुल्कासह सर्व रक्कम १५ दिवसांत जिल्हा बँकेत जमा केली. यानंतर या संस्थेला संबंधित मिळकतीचे खरेदीपत्र मिळणे क्रमप्राप्त होते. प्रत्यक्षात मात्र लिलावाच्या अटीनुसार उच्च न्यायालयाच्या अंतिम मंजुरीशिवाय ते उपलब्ध होऊ शकत नाही आणि न्यायालयात त्याच्या तारखा पडू लागल्याने विश्वस्तांच्या तोंडाला फेस आला आहे. गायन समाज देवल क्लब या संस्थेकडे राजर्षी शाहूंच्या उदार मदतीमुळे शाहू खासबाग  मैदानानजीक एका मोक्याच्या भूखंडाखेरीज उत्पन्नाचे असे कोणतेही साधन नाही, यामुळे गेल्या शंभरएक वर्षांत संस्थेचा पसारा एका मर्यादित परिघाबाहेर जाऊ शकला नाही. हा परिघ ओलांडण्यासाठी संस्थेच्या विश्वस्तांनी कंबर कसली होती. यातून त्यांनी संस्थेच्याच इमारतीत देवल क्लबने आर्थिक अडचणीत विकलेली तळमजल्यावरील भुदरगड नागरी सहकारी पतसंस्थेची ५ हजार चौरस फुटांची मिळकत लिलावाने विकत घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी संस्थेची मिळकत आणि वैयक्तिक व सामूहिक जबाबदारीतून आपल्या स्वत:च्या मिळकती गहाण ठेवून धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेने १० फेब्रुवारी रोजी येथील महालक्ष्मी को-ऑप. बँकेकडून १४ टक्के व्याजदराने १ कोटी ३० लाख रुपये कर्ज घेतले. ही सर्व रक्कम जिल्हा बँकेच्या खात्यामध्ये तात्काळ जमाही करण्यात आली. तेव्हापासून विश्वस्तांचे खरेदीपत्रक करून घेण्यासाठी जिल्हा बँकेच्या पायऱ्या झिजवणे सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर सहनिबंधक आले असता गायन समाजच्या एका शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन व्यथा मांडली. खरेदीपत्र न झाल्याने संस्थेलाही मालमत्ता भाडेतत्त्वावर कोणालाही देता येत नाही. परिणामी, प्रत्येक महिन्याला बँकेचे दीड लाख रुपयांचे व्याज कसे भरायचे असा त्यांचा सवाल होता. गेले चार महिने हे विश्वस्त आपल्या खिशातून प्रत्येकी १० हजार रुपये वर्गणी काढून व्याज भरत आहेत. तेव्हा एकतर खरेदीपत्र तात्काळ करून द्या अन्यथा ते होईपर्यंत ८५ टक्के रक्कम तरी परत करा, अशी विनवणी करणाऱ्या या शिष्टमंडळाला कोणतेही आश्वासन देण्यास अवसायक मंडळ असमर्थ ठरले. उलट खरेदीपत्र करून मिळावे यासाठी तुम्ही न्यायालयात दावा दाखल करा असा सल्ला त्यांना देण्यात आला. यामुळे न्यायप्रक्रियेमार्फत खरेदी केलेल्या मिळकतीचे खरेदीपत्रक करून मिळण्यासाठी न्यायालयात जाण्याची वेळ आल्याने विश्वस्तांची अवस्था ‘करायला गेलो एक’ अशी झाली आहे.
गायन समाज देवल क्लब ही कोल्हापुरातीलच नव्हे तर देशातील सर्वात जुन्या हाताच्या बोटांवर मोजल्या जाणाऱ्या ख्यातनाम संस्थांपैकी एक संस्था आहे. संगीत प्रसाराच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जुनी संस्था म्हणून तिचा लौकिक आहे. १८८३ मध्ये बाबा देवल यांच्या पुढाकारातून निर्माण झालेल्या आणि राजर्षी शाहू छत्रपतींच्या आश्रयाने विस्तारलेल्या या संस्थेला स्वत:च्या उत्पन्नाचे असे कोणतेही मोठे साधन नाही. संस्थात्मक पातळीवर संगीताचे वर्ग प्रथम सुरू करण्याचा मान या संस्थेकडे जातो. पंडित जितेंद्र अभिषेकींचा पहिला जाहीर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या या संस्थेत देशातील अनेक मान्यवरांची कला इथे बहरली. अल्लादियाँ खाँ, बालगंधर्व, भास्करबुवा बखले, अब्दुल करीम खाँ, मास्टर दीनानाथ, पंडित भीमसेन जोशी, वझेबुवा, गानकोकीळ शंकरराव सरनाईक, निवृत्तीबुवा सरनाईक, गोविंदराव टेंबे, केसरबाई केरकर, मोगूबाई कुर्डीकर, किशोरी आमोणकर, अंजनीबाई मालपेकर अशा अनेक दिग्गजांच्या मैफली आयोजित करून रसिकांना संगीताची मेजवानी देण्यात देवल क्लबने पुढाकार घेतला.  १९१८ साली पहिला आठदिवसीय संगीत महोत्सव साजरा करणारी ही संस्था ऊर्जितावस्थेत यावी म्हणून विश्वस्तांनी केलेल्या या धाडसी प्रयत्नाला उच्च न्यायालयाचा एक निर्देश संस्थेला सावरू शकतो. नाहीतर भुदरगडला सावरायला गेलेल्या देवल क्लबची अवस्था ‘बुडत्याला वाचविण्यासाठी गेलेल्या पट्टीच्या पोहणाऱ्यावर गटांगळय़ा खाण्याची वेळ आली’ अशी झाल्याशिवाय राहणार नाही!
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

‘चिनी ज्यादा’ !

अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१०
( sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे.

दिनदर्शिका

गुरुवार, ९ सप्टेंबर २०१०. मिती भाद्रपद शुद्ध प्रतिपदा १२ क. ०८ मि.पर्यंत. उत्तरा  नक्षत्र २० क. ५१ मि.पर्यंत. कन्या चंद्र. सूर्योदय- ६।२६ सूर्यास्त- ६।४६
मेष
- शत्रूंवर लक्ष ठेवा, वृषभ - मुलांचे प्रश्न सुटतील, मिथुन - घरात शांतता ठेवा, कर्क - छोटे-मोठे प्रवास होतील, सिंह - अचानक दडपण वाढतील, कन्या - महत्त्वाचे निर्णय घ्याल, तूळ - देवघेवीत चुका करू नका, वृश्चिक - पैसा हाती येईल, धनू - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल, मकर - प्रयत्न कारणी लागतील, कुंभ - अडचणींचा दिवस, मीन - शासकीय कामे होतील.
शुभराशी : वृश्चिक / धनू / मकर