http://tdpc.org /HomePage.aspx
|
मंगळवार, ९ फेब्रुवारी २०१० बुद्धिबळात ‘चेकमेट’ची नामुष्की टाळण्यासाठी ‘स्ट्रॅटेजी’ म्हणून राजाचे ‘कॅसलिंग’ करतात. त्यामुळे राजाला अधिक पक्के सुरक्षा कवच लाभते असे मानले जाते. महाराष्ट्राच्या ‘जाणत्या राजा’ला थेट ‘मातोश्री’वर जाऊन ‘कॅसलिंग’ करायची पाळी यावी, यावरून त्यांची अगतिकता किती वाढली आहे, हे कुणाच्याही लक्षात येईल.
विशेष म्हणजे ‘मातोश्री’वर राहणाऱ्या महाराष्ट्र नामक जंगलच्या राजाचीही तितकीच अगतिक स्थिती झाली आहे. दिल्लीच्या शतरंज पटावर झालेली कोंडी फोडण्यासाठी मुंबईच्या शिवसेनेच्या गडाला साकडे घालण्याची ही साहेबांची पहिली वेळ नाही. पण दोन अगतिक साहेब एकमेकांना फक्त धीर देऊ शकतात, आधार नाही. राहुल गांधींनी शिवसेनेचा ‘पोपट’ केल्यानंतर त्या मेलेल्या पोपटात प्राण ओतण्याची ही ‘स्ट्रॅटेजी’ जितकी केविलवाणी आहे, तितकीच ‘राष्ट्रवादी’ची अवहेलना करणारी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघपरिवाराला त्यांच्या राष्ट्रीयत्वाचे स्मरण करून दिल्यानंतर सेना-भाजप युतीला संधीवात झाला होता. त्या संधीवातातून शिवसेनेची सुटका करण्यासाठी महाराष्ट्राचा जाणता राजा ‘मातोश्री’कडे धावला की स्वत:ची असहायता लपविण्यासाठी, कांगारूंच्या दौऱ्याचे निमित्त करून उद्धवला पोटात घेण्यासाठी ही गडावरची भेट झाली यावर आता उदंड चर्वितचर्वण होईल. काहीतरी सवंग, चमचमीत, चुरचुरीत चघळायला मिळाले, म्हणून चॅनलवाले खूश होतील. सध्या राजकीय प्रकाशझोतात आणि निष्कारण केलेल्या वादात चमकत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ही चॅनलबाजी! मग प्रश्न अवधूत गुप्तेंच्या झेंडय़ाचा असो, मराठी अस्मितेच्या ‘फंडय़ा’चा असो वा कांगारूंच्या दौऱ्याचा असो. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आहे असे मानले जाते. पण समांतर व पर्यायी सत्ताकेंद्रे मंत्रालयापलिकडे सर्वदूर पसरली आहेत. राष्ट्रवादीचे आर. आर. आबा पाटील गृहमंत्री असूनही कधी ‘मातोश्री’वरून फतवे निघतात तर कधी ‘कृष्णकुंज’मधून! परंतु अवधूत गुप्तेंनी ‘मातोश्री’वरून ‘एनओसी’ मिळविणे वेगळे आणि शरद पवारांनी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना निर्वेधपणे खेळता यावे म्हणून बाळासाहेबांकडे अर्जी दाखल करणे वेगळे. याचा सरळ अर्थ असा आहे की, साहेबांचा आबांच्या कायदा-सुव्यवस्था नियोजनावर विश्वास नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अभय देण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. शिवसेनेची नाही. पण ज्या प्रकारची लाचारी अवधूत गुप्तेंनी दाखविली तशीच शरद पवारांनीही दाखवावी हे राज्याच्या गृहमंत्रालयाला लाज आणणारे आहे. गुप्ते, महेश मांजरेकर आणि नंतर शाहरूख खान यांना संपूर्ण संरक्षण दिले जाईल असे गर्जणाऱ्या आबांकडून ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी संरक्षण दिले गेले असते. पण ती खात्री ‘बीसीसीआय’ला वाटत नाही, की कांगारूंचे निमित्त करून राजकारणातच सर्कस आणायचा साहेबांचा विचार आहे? राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन नवी ‘युती’ बनविण्याची चर्चा दोन वर्षे चालू आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्षभर अगोदर त्या वावडय़ा उडविल्या जात होत्या.भाजप व सेना यांचा घरोबा असला तरी दोन स्वयंपाक वेगवेगळे होत होते. शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘मराठी’ बाण्याच्या मुद्यावरून पाठिंबा दिल्यामुळे भाजप तर काडीमोड घेण्याच्या विचारात होती. शिवसेनेने पंतप्रधानपदासाठीही लालकृष्ण अडवाणींऐवजी शरद पवारांना मराठीच्या मुद्यावरच पाठिंबा देण्याचे सूचित केल्यावर भाजप परिवार पूर्ण बिथरला होता. पवारांनीही या निमित्ताने एकदम संभ्रमाचे वातावरण ठेवले होते. कम्युनिस्टांपासून सेनेपर्यंत आणि नितीशकुमारांपासून चंद्राबाबूंपर्यंत एक मोठीच्या मोठी मोट पवारांनी बांधली होती. इतक्या परस्परविरोधी आणि महत्त्वाकांक्षी/मतलबी मंडळींना एकत्र ठेवण्यासाठी लागणारे कौशल्य सर्कशीत, एकाच वेळेस अनेक चेंडू हवेत उडवून, ते खाली न पडू देणाऱ्या कसरतपटू विदुषकाकडेच असते. काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘फोटोबायॉग्राफी’च्या निमित्ताने, अशाच राजकीय अडचणीच्या वेळेस (आणि तेही राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरून) पवार, जॉर्ज फर्नाडिस, बाळासाहेब आणि साक्षात अटलबिहारी वाजपेयी एका व्यासपीठावर आले होते. तेव्हाही राज्यात राष्ट्रवादी-सेना-भाजप अशा युतीच्या वावडय़ा उडविल्या गेल्या होत्या. आता राज यांनी आपले स्वतंत्र संस्थान निर्माण केले आहे. संघ परिवार सेनेपासून दूर जात आहे. एक नवीन राजकीय पोकळी राज्यात तयार होत आहे. या राजकीय पोकळीत हवा भरली तर सोनिया/राहुल गांधींना ‘चकवा’ देऊन स्वत:ची ताकद दाखविता येईल असाही हिशेब त्यामागे असू शकतो. ‘आम्हाला वगळा, गत:प्रभ होतील तारांगणे’ च्या चालीवर ‘राष्ट्रवादींना वगळा, हतप्रभ होईल युपीए’ असेही पवारांना दाखवून द्यायचे असेल. राहुल व शाहरूख खान यांच्याविरोधातील आंदोलन यशस्वी झाले असते, राहुलचे मुंबईतील कार्यक्रम विस्कटून टाकता आले असते तर एकाच ‘राडय़ात’ उद्धवने राहुल व राज दोघांना ‘चेकमेट’ केले असते. राज ठाकरेही सोनिया व राहुल यांची अश्लाघ्य टिंगलटवाळी करीत असले तरी त्यांचे मनसे अर्थातच शिवसेनेच्याआंदोलनात सामील झाली नव्हती. त्यामुळे आपणच खरे ‘मराठी’चे कैवारी आणि ‘मराठी’ पोलिसांच्या बलिदानाचे वारसदार अशी शिवसेनेची प्रतिमा झाली असती. (म्हणजे असे त्यांना वाटत होते.) पण राहुल यांच्या झंझावाती दौऱ्याने सेनेची हवाच काढून घेतली (आणि मनसेची अब्रू वाचली- कारण अनेक मनसेवाल्यांचा राजला आग्रह होता की त्यांनीही सेनेच्या खांद्याला खांदा लावून मुसोलिनींच्या इटालियन फौजेविरुद्ध लढावे!) एखादे ४० हजार फूट उंचावरून जाणारे विमान एकदम ‘एअर पॉकेट’मध्ये सापडावे आणि नऊ हजार फूट खाली यावे तसे सेनेचे झाले आहे. आता त्या धक्क्यातून सेनेला सावरण्यासाठी शरद पवार पुढे सरसावले आहेत. पवारांना राष्ट्रवादीच्या फौजेबरोबर शिवसेनेची तैनाती फौजही लागणार. किंबहुना शिवसेना तगावी, वाढावी ही पवारांचीच अधिक गरज आहे. काँग्रेसबरोबरचे संबंध जेव्हा जेव्हा बिघडतात तेव्हा तेव्हा पवारांना शिवसेनेची विलक्षण निकड भासते. भाजप आघाडीचे दिल्लीत राज्य होते तेव्हा सोनियाविरोधी राष्ट्रवादी ब्रिगेड ही ‘एनडीए’ची राखीव फौज होती, असे प्रमोद महाजन म्हणत असत. ते समीकरण अजूनही चालविणे शक्य आहे. युतीचे ९० आणि राष्ट्रवादीचे ६० अशी ‘नव-युती’ झाली तर त्यांचे सरकार येऊ शकते. उद्धव आणि गडकरी दोघेही या ‘फॉम्र्युल’चा स्वीकार करू शकतील. कारण सेना व भाजप दोघांना सत्तेत सहभागी होता येईल, मोहनराव भागवतांचा सेनाविरोध बोथट करता येईल, युती टिकेल, राज ठाकरेंचे आव्हान थोपविता येईल आणि त्या सर्वाचा मुख्य शत्रू-सोनिया-राहुल प्रणित काँग्रेस-यांना खिंडीत पकडता येईल असे ते गणित असू शकते. याचा अर्थ अशी तिरपागडी ‘नव-युती’ लगेच होईल असे नाही. पण वावडय़ा उठवून काँग्रेसला थोडे भयभीत करता आले तर तेवढीच गंमत! पवारांना अशा गमती करायला खूप आवडते. म्हणूनच त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंची भेट घेऊन एकच खळबळ उडवून दिली. पण त्यांच्या हे लक्षात आले नाही की त्यातून जी गंमत झाली त्यात त्यांचे व त्यांच्या पक्षाचे केविलवाणे हसे झाले आणि उद्धवचे विमान अधिकच ‘एअर पॉकेट’मध्ये गेले. खरे तर आता पवारांच्या विमानाचेच एक इंजिन बंद पडले आहे. त्या इंजिनाला शिवसेनेचे इंजिन जोडून राष्ट्रवादीचे विमान हवेत उडू शकणार नाही.
|
|
लोकरंग
प्राप्तिकराची कूळकथा
 मिलिंद संगोराम - रविवार, २५ जुलै २०१० १८६० मध्ये भारतीयांवर पहिल्यांदा प्राप्तिकर लादला गेला. भारतीय प्राप्तिकराला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त काल भारतीय प्राप्तिकर विभागातर्फे ‘इन्कम टॅक्स डे’ साजरा केला गेला. भारतीय प्राप्तिकराच्या आरंभकाळाचा इतिहास खूपच रंजक आहे. प्राप्तिकर, परवाना कर व तंबाखू कर अशा तीन नवीन करांची घोषणा तेव्हा जेम्स विल्सन या पहिल्या इंग्रज ‘फायनान्स मेंबर’ ने १८६० मध्ये केली होती.
|
दिनदर्शिका
शुक्रवार ३० जुलै २०१०, भारतीय सौर ८ श्रावण १९३२. मिती आषाढ वद्य चतुर्थी १६ क. ३० मि. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रे २० क. ५० मि. कुंभचंद्र १४ क. ७ मि. सूर्योदय : ६/१६. सूर्यास्त : ७/१४. मेष - संधी अचूक टिपा, वृषभ - राजकारणात चमकाल, मिथुन - योग्य दिशा मिळेल, कर्क - नुकसान संभवते, सिंह - पत्नीचा सल्ला घ्या, कन्या - चलबिचल होईल, तूळ - अभ्यासात लक्ष ठेवा, वृश्चिक - मिळतेजुळते घ्या, धनू - निर्धाराने पुढे चला, मकर - व्यासपीठावर चमकाल, कुंभ - मनोधैर्य उंचावेल, मीन - खोटे काही करू नका. शुभराशी- वृषभ, मकर, कुंभ.
|