मुखपृष्ठ >> वृत्तान्त कॅम्पेन >> वृत्तांत कॅम्पेन : आर्थिक अंधश्रद्धेच्या विषवल्लीने हजारोंच्या लाखांचे १२ हजार!
 


स्पर्धेचे नियम व अटी




वृत्तांत कॅम्पेन : आर्थिक अंधश्रद्धेच्या विषवल्लीने हजारोंच्या लाखांचे १२ हजार! Bookmark and Share Print E-mail
प्रशांत मोरे - रविवार, ७ फेब्रुवारी २०१०
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it
आजच्या कमाईतले काही पैसे स्वत:च्या तसेच कुटुंबियांच्या भवितव्यासाठी राखून ठेवणे ही एक स्वाभाविक मानवी प्रवृत्ती आहे. अनेकजण येणारा काळ सुखात जावा म्हणून आज पोटाला चिमटा काढून बचत करतात. त्यासाठी ऐन उमेदीच्या काळात छानछौकीच्या जीवनापासून कटाक्षाने दूर राहतात. कुणी मुला-मुलींच्या उच्चशिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी पै पै गाठीला बांधतात.नोकरीच्या काळात अनेकांना मुंबई परिसरात स्वत:चे घर घेणे परवडत नाही. मग सेवानिवृत्तीची पुंजी आणि काही वर्षांची बचत मिळवून एखादे छोटेसे का होईना, स्वत:चे घर घेण्याचा मनसुबा कुणीतरी बाळगलेला असतो. साचलं पाणी फार काळ टिकत नाही असे म्हणतात, पण गेल्या काही वर्षांंत स्वेच्छानिवृत्तीमुळे हजारो कुटुंबियांना व्याजावर जगण्याची वेळ आली आहे. नोकरी सोडताना कंपनीने भरपाई म्हणून दिलेली रक्कम हातात पडतेवेळी मोठी वाटते. ग्रॅज्युइटी आणि फंड याव्यतिरिक्त कुणाला दहा, तर कुणाला पंधरा लाखही मिळतात. मात्र या पैशाला हजार वाटा असतात. घरातील दैनंदिन खर्च, मुलांचे शिक्षण, त्यांची लग्न.. या साऱ्याला तोंड देताना अनेक कुटुंबांची गणिते चुकतात. बँकांचा व्याजदर दिवसेंदिवस कमी होत असल्याने त्यांच्यापुढचा पेच आता अधिकाधिक जटिल होत चालला आहे.अशावेळी अनेक सुबुद्धांची सद्सद्विवेक बुद्धी गहाण पडते. ‘नो रिक्स नो गेन’ या तत्त्वानुसार चालावे असे वाटू लागते. अगदी ओळखीतलाच कुणीतरी बँकांपेक्षा कितीतरी जास्त दराने व्याज देणारी गुंतवणूक योजना सुचवितो. त्या योजनेत पैसे गुंतविल्याने कुणाचा कसा आणि किती फायदा झाला याचे दाखले देतो. शहरातील एखाद्या तारांकित हॉटेलमध्ये कंपनीचे प्रवर्तक या संभाव्य गुंतवणूकदारांची सभा घेतात. सारे जग मंदीच्या गर्तेत गटांगळ्या खात असताना आमचा समूह कसा खोऱ्याने नफा कमवतोय, याचे पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन घडविले जाते. अशा प्रकारच्या अनेक योजना गुंतवणूकदार म्हणूनच नाही, तर एजंट म्हणूनही ग्राहकाला आपल्या जाळ्यात ओढतात. तुम्ही तीन सभासद आणलेत की कमिशन सुरू असा हा व्यवहार असतो. या योजनेत पैसे गुंतविलेल्या काही सेलिब्रिटीज्च्या मुलाखती उदाहरणादाखल दाखविल्या जातात. भारतातल्या सर्व प्रमुख थंड हवेच्या ठिकाणी आपले टायअप आहेत, असे सांगून वर्षांकाठी यापैकी कोणत्याही शहरात काही दिवस कमी दरात अथवा विनामूल्य राहण्याची ऑफर्सही काही कंपन्या देतात. काहीजण सर्व रोगांपासून मुक्ती मिळवून देणारी दिव्य उपचार पद्धतीचे मार्केटिंग करतात. काही वर्षांपूर्वी चुंबकीय तत्त्वाच्या जपानी गादीचे प्रस्थ वाढले होते, तो यातलाच एक प्रकार होता.  केवळ स्वेच्छानिवृत्ती अथवा निवृत्ती पत्करलेलेच नाइलाज म्हणून अशा योजनांमध्ये पैसे गुंतवितात असे नाही. कमी कष्टात, कमी वेळेत आपल्या जवळची पुंजी दुप्पट करण्याच्या लोभाने अनेकजण लाखो रुपये अशा योजनांमध्ये अडकवितात. या आर्थिक अंधश्रद्धेपोटी काही जणांनी चांगल्या कायमस्वरूपी नोक ऱ्यांवर पाणी सोडले. अशा प्रकारच्या ९९ टक्के योजना बोगस असल्याचे गेल्या काही वर्षांत सिद्ध झाले आहे. सारी सोंगे आणता येतात, पैशाचे सोंग आणता येत नाही, हे माहिती असूनही अनेकजण हा जुगार खेळतात. पाच, दहा किंवा पंधरा-वीस हजार गुंतवणूक करणारे अक्कलखात्यात पैसे गेले समजून गप्प बसतात. अनेकांना पैशापेक्षा इज्जत प्रिय असते. लोक काय म्हणतील या भीतीने ते गप्प राहतात. पुन्हा या उफराटय़ा योजनेचा एजंट म्हणून कुणीतरी आप्तच दारी आलेलो असतो. परिणामी, तक्रार करण्यास ही मंडळी पुढे येत नाहीत. शिवाय कोटय़वधी रुपयांचा गफला करणाऱ्या या योजनांची रिकव्हरी होऊन गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळाल्याचीही फारशी उदाहरणे नाहीत. लाखाचे बारा हजार करणाऱ्या या कंपन्यांमध्ये काही पतपेढय़ांचाही समावेश आहे. आपल्या गावच्या, तालुक्याच्या अथवा जिल्ह्य़ाच्या नावे असलेल्या या पतसंस्थांमधून त्या त्या प्रदेशातील लोक मोठय़ा विश्वासाने पैसे गुंतवितात आणि मग मन:स्ताप करीत बसतात.
ज्यांचे सर्वस्वच या योजनांनी लुबाडले असे काही मोजके तक्रार करतात आणि या योजनांचे भांडे फुटते. इतर अनेक वैशिष्टय़ांप्रमाणे ठाणे हे अशा उल्लुमशाल योजनांचे एक प्रमुख केंद्र झाले आहे. ठाणे शहराप्रमाणेच डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथमध्येही या भुलभुलैय्यात अडकलेले शेकडो गुंतवणूकदार आहेत.                
अशा ‘आकर्षक’ योजनांमध्ये पैसे गुंतवून तुम्ही आर्थिक नुकसान पदरात पाडून घेतले असेल, तर तो अनुभव ‘वृत्तान्त’मध्ये शेअर करा. ‘पुढच्याला ठेच मागचा शहाणा’ या न्यायाने भविष्यात तरी या फसव्या मोहजाळ्यात अडकणाऱ्यांची संख्या कमी होईल. आपण आपले अनुभव २०० शब्दांमध्ये लिहून पाठवावेत. निवडक प्रतिक्रियांना प्रसिद्धी दिला जाईल. वाचकांनी खालील पत्त्यावर पत्रे पाठवावीत. लोकसत्ता कार्यालय, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प) दूरध्वनी- २५३८५१३२, फॅक्स- २५४५२९४२, २५३३०२८१.
प्रतिक्रिया येथे नोंदवा
तुमची संपर्क माहिती:
प्रतिक्रिया:

!joomlacomment 4.0 Copyright (C) 2009 Compojoom.com . All rights reserved."

 

ताज्या बातम्या



लोकरंग

प्राप्तिकराची कूळकथा

मिलिंद संगोराम - रविवार, २५ जुलै २०१०
१८६० मध्ये भारतीयांवर पहिल्यांदा प्राप्तिकर लादला गेला. भारतीय प्राप्तिकराला दीडशे वर्षे झाल्यानिमित्त काल भारतीय प्राप्तिकर विभागातर्फे ‘इन्कम टॅक्स डे’ साजरा केला गेला. भारतीय प्राप्तिकराच्या आरंभकाळाचा इतिहास खूपच रंजक आहे. प्राप्तिकर, परवाना कर व तंबाखू कर अशा तीन नवीन करांची घोषणा तेव्हा जेम्स विल्सन या पहिल्या इंग्रज ‘फायनान्स मेंबर’ ने १८६० मध्ये केली होती.

दिनदर्शिका

शुक्रवार ३० जुलै २०१०, भारतीय सौर ८ श्रावण १९३२. मिती आषाढ वद्य चतुर्थी १६ क. ३० मि. पूर्वाभाद्रपदा नक्षत्रे २० क. ५० मि. कुंभचंद्र १४ क. ७ मि. सूर्योदय : ६/१६. सूर्यास्त : ७/१४.
मेष
- संधी अचूक टिपा, वृषभ - राजकारणात चमकाल, मिथुन - योग्य दिशा मिळेल, कर्क - नुकसान संभवते, सिंह - पत्नीचा सल्ला घ्या, कन्या - चलबिचल होईल, तूळ - अभ्यासात लक्ष ठेवा, वृश्चिक - मिळतेजुळते घ्या, धनू - निर्धाराने पुढे चला, मकर - व्यासपीठावर चमकाल, कुंभ - मनोधैर्य उंचावेल, मीन - खोटे काही करू नका.
शुभराशी- वृषभ, मकर, कुंभ.